महाराष्ट्र

धाराशिवात डीजेवर कडक बंदी पोलिसांचा मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ

सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्या डीजे चालक व मंडळांना पोलिसांची स्पष्ट चपराक

धाराशिव (प्रतिनिधी)

धाराशिव शहरात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे (DJ) वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोणत्याही मंडळांनी डीजे बुकिंग करू नये, असा गर्भित इशारा धाराशिव पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला. शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये वेळोवेळी शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत असून त्यामध्ये प्रामुख्याने डीजे बंदी यावर चर्चा करण्यात येत आहे. सर्व उत्सव मंडळांना स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच ही कारवाई केली जात आहे. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय राबविण्यात येत असल्याची माहिती धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी स्पष्ट केले आहे.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी अशा आवाजामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात विविध महापुरुषांच्या जयंती तसेच धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
पोलिसांनी उत्सव मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले असून डीजे, मिक्सर व साऊंड सिस्टिमचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच राज्यासह परराज्यातील डीजे चालकांनाही धाराशिव शहरात कोणतीही बुकिंग स्वीकारू नये, अन्यथा त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईसोबत आर्थिक फटका बसू शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या धडाकेबाज निर्णयामुळे शहरात शांतता राखण्यास मदत होणार असून कायद्याचे पालन करणाऱ्यांचे समाधान व्यक्त होत आहे, तर नियम मोडणाऱ्यांसाठी हा स्पष्ट इशारा ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page