
तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील काटी गावात व परिसरातील हॉटेलमध्ये बेकायदेशीर अवैध दारू विक्री जोमात सुरू असून अशा दारू विक्रीला आशीर्वाद नेमका कोणाचा आहे? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्थानिक पोलिसांची उदासीनता आणि राज्य उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्रीत सर्रास वाढ होत आहे. काटी तुळजापूर मार्गावरील अनेक हॉटेल, ढाब्यांमध्ये देशी-विदेशी दारू सहज मिळत असल्याने हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. दारूच्या बाटलीवर असणाऱ्या किंमतीपेक्षा अधिक चढ्या दराने दारू विक्री केली जात आहे.
दारू पिणार्यांची संख्या वाढत असल्याने भांडणाचे प्रकार वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे चित्र सध्या या मार्गावर घडत आहे. अनेक हॉटेलमध्ये चोवीस तास सहज दारू उपलब्ध होत असल्याने अनेक युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार या दारूवर खर्च करीत आहेत. अशा या अवैध दारू विक्रीविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी महिला व नागरिकांमधून होत आहे.
परवान्यापेक्षा हप्ता परवडला
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कानाडोळा केल्यामुळे बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू विक्रीचा परिसरातील परवानाधारक बार, परमिट रूम चालकांवर विपरीत परिणाम होत आहे. मद्य विक्रीचा परवाना घेण्यापेक्षा हप्ते देऊन दारू विक्री करणे परवडत असल्याचे काही परवानाधारकांचे म्हणणे आहे. पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या तडजोडीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, त्यामुळे येथे सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे, असे नागरिक आणि परवानाधारकांचे म्हणणे आहे.

