महाराष्ट्र

नामस्मरणासारखी मोठी ताकत नाही – आचार्य अर्जुन लाड गुरुजी

तेवीस वर्षांपासून अखंड सुरू आहे नामस्मरणाची परंपरा

पांगरदरवाडी / प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे सोमवार, दि. 26 जानेवारी रोजी “राम कृष्ण हरी” नामजप सप्ताहाची सांगता आचार्य अर्जुन लाड गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेने करण्यात आली. या प्रसंगी नामस्मरणाची महती सांगताना गुरुजी म्हणाले, नामस्मरणासारखी मोठी ताकत नाही. नामातच मन:शांती, आत्मबळ आणि जीवनाचे सार आहे.”

या कीर्तन सेवेसाठी संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 231 वा अभंग घेण्यात आला होता—

अवघें चि गोड जालें मागीलये भरी आलें ॥१॥

साहय जाला पांडुरंग दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.

थडिये पावतां तो वाव मागें वाहावतां ठाव ॥२॥

तुका म्हणे गेलें स्वप्नींचें जागें जालें ॥३॥

या अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या भेटीमुळे किंवा निस्सीम भक्तीमुळे जीवनातील सर्व उणीवा भरून निघतात, मागील पाप-पुण्याचा हिशोब संपून जीवन गोड व सार्थक होते, असा संदेश देण्यात आला. संतांच्या मते आत्मसाक्षात्कारानंतर दोष-गुणांची जाणीव लोप पावते आणि सर्वत्र ईश्वरी गोडवा अनुभवास येतो.

पांगरदरवाडी येथे गेल्या तेवीस वर्षांपासून अखंडपणे “राम कृष्ण हरी” नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. सन 2004 पासून सुरू असलेली ही परंपरा कोरोना महामारीच्या कठीण काळातही अखंड सुरू होती, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page