कृषिवार्ता

तुळजापूर तालुक्यात ऊस पिकावर ‘कानिकवळी’ बुरशीचा प्रादुर्भाव

शेतकरी दुहेरी संकटात; लाखो रुपयांचा खर्च धोक्यात

तामलवाडी/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यात गतवर्षी व चालू वर्षात झालेल्या मुबलक पावसामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली आहे. मात्र, याच वेळी खोडवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘कानिकवळी’ या बुरशीजन्य रोगाचे मोठे संकट उभे आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये खोडवा ऊसावर या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः ८००५ या ऊस वाणामध्ये या बुरशीचे प्रमाण अधिक असल्याची माहिती शेतकरी व कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. परिणामी ऊसाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खोडवा ऊसासाठी लागणारा खर्च हा नव्या ऊस लागवडीइतकाच असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मशागत, खतांचा वापर, औषध फवारणी आणि मजुरी यावर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

कानिकवळी बुरशीमुळे ऊसाची वाढ खुंटणे, कांड्या कमकुवत होणे आणि वजनात घट होणे असे परिणाम दिसून येत आहेत. काही ठिकाणी संपूर्ण पट्ट्यांमध्ये रोगाचा फैलाव झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, तसेच बुरशी नियंत्रणासाठी आवश्यक औषधे व उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी रोगनियंत्रण उपाययोजना केल्यास नुकसान कमी करता येऊ शकते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर माहिती व मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे.  एकीकडे वाढलेले लागवड क्षेत्र आणि दुसरीकडे वाढता रोग प्रादुर्भाव यामुळे तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

गेल्या वर्षी मी पाच एकर उसाची लागवड केली होती. त्याचे उत्पादन देखील चांगले निघाले आहे. मात्र, खोडव्या ऊसाला प्रचंड कानिकवळी आहे. पाच फूट उंचीचा ऊस आम्ही मोडला आहे. 

बालाजी शिंदे – शेतकरी पांगरदरवाडी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page