महाराष्ट्र

महाऑनलाइन पोर्टलचा बोजवारा ! सलग तीन दिवसांपासून साइट बंद

तुळजापूर : शासकीय कामांसाठी अत्यंत आवश्यक असलेले महाऑनलाइन पोर्टल गेल्या तीन दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव ठप्प पडले आहे. यामुळे तुळजापूर तहसील कार्यालयामार्फत मिळणारे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. ऐन गरजेच्या वेळी पोर्टल बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करत हेलपाटे मारावे लागत असून, मोठी गैरसोय होत आहे.

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शैक्षणिक कामांसाठी सध्या उत्पन्न प्रमाणपत्राची मोठी गरज आहे. यासाठी शेकडो नागरिकांनी सेतू केंद्र आणि महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने हे अर्ज तहसील प्रशासनाकडे पोहोचू शकत नाहीत व त्यावर प्रक्रिया होत नाहीये. उत्पन्न, रहिवासी आणि इतर आवश्यक दाखले मिळणे बंद झाले आहे.

ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना काम होत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. पोर्टल बंद असल्यामुळे अर्जांचा डोंगर साचला असून, साइट सुरू झाल्यावरही कामाचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह

“गेल्या तीन दिवसांपासून आम्ही दाखल्यासाठी चकरा मारत आहोत, पण साइट बंद आहे, एवढेच उत्तर मिळते. ही तांत्रिक अडचण कधी दूर होणार?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लवकरच मार्ग निघण्याची अपेक्षा

महाऑनलाइनची साइट ही राज्यस्तरावरून हाताळली जात असल्याने स्थानिक प्रशासनाचे हात बांधलेले आहेत. तरीही, ही तांत्रिक अडचण तातडीने सोडून पोर्टल पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी वसमत तालुक्यातील जनतेने केली आहे. आता हे पोर्टल नेमके कधी कार्यान्वित होते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page