महाराष्ट्रकृषिवार्ता

धाराशिवच्या आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळ

चारा डेपो, टँकर व रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य; खरीप नुकसानीच्या अनुदानानंतर  लवकर पीकविम्यासाठीही प्रयत्न

धाराशिव / प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरू आहे. चारा डेपो, पाणी उपलब्ध करून देणे आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने खरीप नुकसानीचे अनुदान आणि त्यानंतर पीकविमा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते. आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणीही केली. जिल्ह्यातील पिकांच्या गंभीर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनासमोर ठेवण्यासाठी प्रथमच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबई येथील आयआयटीतील वरिष्ठ तज्ज्ञ, महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादरही करण्यात आला आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसान याबाबत मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पंचनामे व नुकसानभरपाई निश्चित करताना या तांत्रिक माहितीचा मोठा उपयोग होणार असून, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठीही ती महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे तातडीने टँकर भरण्याची सुविधा  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरे वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार त्याबाबतही तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दुष्काळामुळे शेतीवरील उत्पन्नाचा स्रोत अडचणीत आलेल्या कुटुंबांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळून चरितार्थासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी रोजगार हमीची कामे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page