मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार; उजनीचे पाणी मराठवाड्यात खळाळणार..!

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला वेग; दुष्काळी भागासाठी ठरणार जलक्रांतीचा टप्पा
तामलवाडी : वर्षानुवर्षे दुष्काळ, पाणीटंचाई आणि अनिश्चित पावसाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी आता मोठी आशा निर्माण झाली आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे पाणी उजनी धरणात आणून तेथून मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्याच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला गती मिळत आहे. या प्रकल्पाची कामे पुढे सरकत असल्याने मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत आहे. दोन महिन्यात उजनी धरणाचे पाणी मराठवाड्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितल्यामुळे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष उजनीच्या पाण्याकडे लागले आहे.

मराठवाड्याच्या मोठ्या भूभागाला आजही पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागत आहे. सलग तीन वर्षे समाधानकारक पाऊस झाला, तर सलग तीन वर्ष मराठवाड्यातील सर्व जिल्हे दुष्काळाच्या छायेत असतो. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कृष्णेचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यात पोहोचविण्याची संकल्पना या भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी उजनी धरणात आणून त्याचा पुढे मराठवाड्यासाठी उपयोग करण्याची व्यवस्था आकाराला आल्यास धाराशिवसह दुष्काळी भागातील पाणी उपलब्धतेचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलू शकते. उजनीच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करून ते गरजेच्या भागात पोहोचविणे शक्य होणार असल्याने या संपूर्ण योजनेकडे मराठवाड्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध जलसाठा यातील तफावत सातत्याने जाणवते. अशा परिस्थितीत बाह्य जलस्रोत उपलब्ध झाल्यास पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो. विशेषतः दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प केवळ पाणीपुरवठ्याची योजना नसून शेतीला स्थैर्य देणारा आणि गावांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे. Krush-मराठवाडा प्रकल्पातील उपसा सिंचन व्यवस्थेला मोठ्या क्षमतेची पंपयंत्रणा जोडली जात आहे. २७,९१६ अश्वशक्तींच्या पंपांद्वारे कृष्णेचे पाणी उचलण्याची क्षमता या योजनेची व्याप्ती स्पष्ट करते. घाटणे बॅरेज-रामदरा टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा आहे. आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासातील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक म्हणजे पाण्याची अनिश्चितता. पाणी उपलब्ध झाले तर शेतीचे क्षेत्र वाढू शकते, पीक पद्धतीत बदल होऊ शकतो, उद्योगांना चालना मिळू शकते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे पाणी उजनीमार्गे मराठवाड्यात पोहोचणे म्हणजे केवळ पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे नव्हे; तर मराठवाड्याच्या जलसुरक्षेचा नवा अध्याय सुरू होणे आहे. वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मराठवाड्याला आता मोठ्या जलप्रकल्पांकडून अपेक्षा आहेत. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात असताना उजनीचे पाणी मराठवाड्यात खळाळण्याची आशा अधिक बळकट होत आहे. कृष्णेचे पाणी उजनीत, उजनीचे पाणी मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या शेतात पाणी—हीच दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल ठरू शकते. मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटविण्याच्या दिशेने हे पाऊल ठरले, तर येणाऱ्या काळात हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचा गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.




