ब्रेकिंग

गटविकास अधिकाऱ्यांनाच नाही वेळेचे भान

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपणच कोरडे पाषाण’ अभ्यंगतांना दुपारपर्यंत ताटकळत ठेवले

तुळजापूर : ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या पंचायत समिती कार्यालयातील शिस्त व कार्यतत्परतेबाबत नेहमीच कर्मचाऱ्यांना जाब विचारणारे गटविकास अधिकारीच जर वेळेचे भान ठेवत नसतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी, असा संतप्त सवाल सध्या तुळजापूर तालुक्यातील जनता उपस्थित करत आहे.

तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी तब्बल दुपारी दोन वाजता कार्यालयात दाखल झाल्याने सकाळपासून त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना व लोकप्रतिनिधींना अक्षरशः ताटकळत बसावे लागले. सकाळपासून नागरिकांची पंचायत समिती कार्यालयात गर्दी होती मात्र, अधिकारी बेपत्ता असल्याचे दिसून आले.

घरकुल योजना, मनरेगा, पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान, ग्रामविकास कामे तसेच विविध तक्रारी घेऊन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व सामान्य नागरिक सकाळीच पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले होते. मात्र गटविकास अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती.

 

विशेष म्हणजे, पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना उशिरा येणे, अनुपस्थिती, कामातील दिरंगाई यावर वारंवार कारवाईचा इशारा देणारे गटविकास अधिकारी स्वतःच कार्यालयीन वेळेचे पालन करत नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपणच कोरडे पाषाण’ या म्हणीचा प्रत्यय येणारी ही घटना असल्याची चर्चा कर्मचारी व नागरिकांमध्ये सुरू आहे. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रमुख अधिकारी असतो. त्यांच्या अनुपस्थितीमुळे निर्णय रखडतात, कामांना मंजुरी मिळत नाही आणि ग्रामपंचायतींच्या विकास कामांवर थेट परिणाम होतो. अशा प्रकारे वारंवार उशिरा येणे किंवा कार्यालयात अनुपस्थित राहणे हे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे जाणकारांचे मत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कार्यालयीन शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींमधून होत आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालय म्हणजे केवळ ताटकळण्याचे ठिकाण ठरेल, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बायोमॅट्रिक हजेरी बनली शोभेची वस्तू

पंचायत समिती कार्यालयात शिस्त आणि वेळपालनासाठी बसविण्यात आलेली बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली केवळ शोभेपुरतीच उरल्याचे चित्र आहे. हि यंत्रणा दुळखात पडली असून कर्मचारी याचा वापर करतात की नाही याची शंका निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page