महाराष्ट्र

एक मार्चला होणार 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिराचेही आयोजन

धाराशिव  : शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय (पळसप), महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने पळसप (ता. धाराशिव) येथे एक मार्च रोजी 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

शिक्षक आमदार वसंतराव काळे यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देता यावा, यासाठी त्यांच्या 20 व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सुप्रिसद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश सावंत (नांदेड) हे संमेलनाध्यक्ष आहेत. एक मार्चला सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीचे उदघाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे (बार्शी) कोषाध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. घ. ना. पांचाळ (मुंबई) यांच्या हस्ते तर सव्वा दहा वाजता सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे (धाराशिव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री संजय बनसोडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दीड वाजता बदलते ग्रामीण जीवन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. गंगाधरराव हिंगोले अध्यक्षस्थानी असतील. सुप्रसिद्ध वक्तके प्राचार्य राजकुमार मस्के (उदगीर), प्रा. डॉ. कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर) यांचा सहभाग असेल. दुपारी तीन वाजता कथाकथन होईल. सत्यशिला तौर (जालना) अध्यक्षस्थानी असतील. प्रा. सुरेश पाटील (अंबाजोगाई), स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांचा सहभाग असेल. दुपारी साडेचार वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रा. जिजा शिंदे (छत्रपती  संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असतील.
संमेलनाचा समारोप सायंकाळी सहा वाजता होणार आहे. डॉ. सुरेश सावंत अध्यक्षस्थानी असती. यावेळी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे  सदस्य प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी (मुंबई), मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य विलास सिंदगीकर (छत्रपती संभाजीनगर) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य मधुकरराव गायकवाड, प्राचार्य अनिल वसंतराव काळे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, बालाजी तांबे यांनी केले आहे.

दरम्यान, 28 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता ह. भ. प. कु. ईश्वरी दिदी महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page