कर वसुलीसाठी माजी सैनिकावर आंदोलनाची वेळ
अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कर वसुलीला ब्रेक, त्या कंपनीने अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याची चर्चा

तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतींचा कर वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून कर वसुलीसाठी एका माजी सैनिकाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांना कर वसुलीच्या नोटिसा बजावूनही गेल्या अडीच वर्षांपासून प्रत्यक्ष वसुली न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक सावंत शिवाजी यांनी पंचायत समिती तुळजापूर येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत, दिनांक २२ डिसेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १२४ नुसार कर वसुलीची ठोस कारवाई न झाल्यास पंचायत समिती तुळजापूर समोर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
तामलवाडी येथील पंचक्रोशीतील औद्योगिक वसाहतींमधून मोठ्या प्रमाणावर कर वसुली अपेक्षित असताना, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सातत्याने वेळकाढूपणा होत असून कंपन्यांनी अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सावंत शिवाजी यांनी गटविकास अधिकारी यांना थेट जाब विचारत म्हटले आहे की, “अडीच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. प्रत्येक वेळी आंदोलन केल्याशिवाय प्रशासन हालचाल करत नाही. आतापर्यंत या कर वसुलीसाठी तब्बल सात वेळा आंदोलने करावी लागली असून भांडवली मूल्यावर आधारित कर वसुली हे प्रशासनाचे कर्तव्य असताना, आपण हे काम मुद्दाम प्रलंबित ठेवत आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.
याचबरोबर, “विरोधी पक्षांच्या ग्रामपंचायत हद्दीतील कामे करू नयेत, असा कोणत्या सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गटविकास अधिकारी एक कुशल प्रशासक म्हणून या प्रकरणात ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करत सावंत यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या इशाऱ्यामुळे तामलवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कर वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन २२ डिसेंबरपूर्वी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




