एकाच छताखाली सर्व सेवा…! तामलवाडीत महसूल महाराजस्व अभियानात विक्रमी कामगिरी
शिबिरात 140 प्रमाणपत्रांचे वितरण; शेकडो नागरिकांना दिलासा

तामलवाडी / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शुक्रवार दि.10 एप्रिल 2026 रोजी श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. या शिबिरात 140 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
शिबिरामध्ये रहिवासी, उत्पन्न व जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत 45 लाभार्थींना मंजुरी प्रमाणपत्रे देण्यात आली. शेतरस्ता संदर्भात 14 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर 10 प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली.
पुरवठा विभागाच्या 80 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच पीएम किसान, आरोग्य व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मिळून सुमारे 70 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. वारस फेरफार अंतर्गत 45 कुटुंबांना वारस मंजूर करून 7/12 उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.
लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत 11 लाभार्थींना मोफत 7/12 व 8-अ फेरफार देण्यात आले. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदार यांच्या हस्ते 15 लाभार्थींना वाटणीपत्र देऊन मोफत 7/12 व 8-अ वितरित करण्यात आले. याशिवाय मंडळातील सुमारे 150 शेतकऱ्यांना मोफत 7/12 व 8-अ देण्यात आले. वडगाव काटी येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत गवळी यांना पुण्य पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा हि व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी तहसीलदार तुळजापूर श्री. अरविंद बोळंगे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सौ. संगीता जगन्नाथ गवळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पुरुषोत्तम कोकरे, नायब तहसीलदार श्री. कोणाले व श्रीमती कोळगे उपस्थित होते. तसेच मंडळ विभागातील सर्व गावांचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसुते सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी बालाजी लाकाळ, श्रीधर माळी, सुरेश पाटील, संजीवनी स्वामी, तेजश्री जगदाळे, प्रगती पवार तसेच महसूल सेवक हनुमंत क्षीरसागर, शैला गाटे/मगर व अविनाश कांबळे यांनी केले.
एकंदरीत, हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



