महाराष्ट्रब्रेकिंग

दिवाळीच्या आनंदावर काळाचा घाला! येडशीत भीषण अग्नितांडव; करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : दिवाळीच्या सणाचा आनंद, घराघरांत उजळलेले दिवे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच येडशी गावावर काळाने घाला घातला आहे. येथील करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर तसेच लगतच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने संपूर्ण येडशी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

दिवाळीच्या प्रकाशोत्सवात करंडे कुटुंबावर मात्र दुःखाचा अंधार पसरला आहे. रात्रीच्या सुमारास दुकान आणि घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, रात्रीपासून सकाळपर्यंत ग्रामस्थ, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.या भीषण अग्नितांडवात उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवाळीच्या सणात ज्या घरात आनंदाचे दिवे उजळायला हवे होते, त्याच घरात आगीच्या दुर्घटनेने काळोख पसरवला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने येडशी गाव सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page