परदेशी व्यापाराचे आमिष अन् लाखोंचा चुना; मसला खुर्दच्या युवकाची फसवणूक
मसला खुर्द येथील युवकाची ₹6.75 लाखांची आर्थिक फसवणूक; नेदरलँडला सोयाबीन फूड ऑईल निर्यातीचे आमिष

मसला खुर्द येथील युवकाची ₹6.75 लाखांची आर्थिक फसवणूक; नेदरलँडला सोयाबीन फूड ऑईल निर्यातीचे आमिष
तामलवाडी : नेदरलँड (युरोप) येथे सोयाबीन फूड ऑईल निर्यात करून देण्याचे आमिष दाखवत आंतरराष्ट्रीय कागदपत्रे तयार करण्याच्या नावाखाली मसला खुर्द येथील युवकाची ₹6 लाख 75 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणविर सिंग, आकांक्षा, भूपेंद्र सिंग आणि रिया ठाकूर, सर्व रा. नोयडा, उत्तर प्रदेश यांनी कथितरित्या ‘एंकाश ग्लोबल’ या संस्थेच्या माध्यमातून सोयाबीन फूड ऑईल नेदरलँड येथे निर्यात करून देण्याचे सांगितले. तसेच त्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय कागदपत्रे तयार करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आमिषातून संबंधितांनी मोहित शर्मा यांच्या खात्यावर RTGS तसेच UPI द्वारे वेळोवेळी एकूण ₹6,75,000 रुपये घेतले. मात्र, त्यानंतर अपेक्षित सेवा किंवा निर्यातीची प्रक्रिया पूर्ण न करता विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विवेकानंद सुदर्शन जाधव (वय 20, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी 25 सप्टेंबर 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


