अळणी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; १२ जण ताब्यात, २१.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. ८ : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, लातूर-ढोकी रोडवरील अळणी येथे चालविण्यात येत असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक छापेमारी करण्यात आली. या कारवाईत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण सोमवंशी, श्री. सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामचंद्र बहुरे, तसेच क्यूआरटी (QRT), आरसीपी (RCP) पथकातील अधिकारी, अंमलदार व चालकांचा सहभाग होता.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. अळणी येथील ‘दर्शन बियर बार अँड परमिट रूम’ च्या आडोशाने अवैधरित्या तीन पत्ती (तिरट) जुगार क्लब चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सदर ठिकाणी पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन जुगार खेळविला जात होता. जुगाराचे ठिकाण बारच्या मागील बाजूस असून चहूबाजूंनी शेतांनी वेढलेले असल्याने ते सहज नजरेस पडत नव्हते. मात्र, पोलिसांनी आखलेल्या नियोजनबद्ध छापेमारीमुळे संशयितांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
बार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२१.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, पत्ते, कॉईन्स, मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने, चार दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण रु. २१,९०,३०५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
