कृषिवार्ता

“अल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; पेरणीची घाई टाळा, कृषी विभागाचे आवाहन”

“अल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; पेरणीची घाई टाळा, कृषी विभागाचे आवाहन”

तामलवाडी : यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे, पावसाचा खंड पडणे तसेच पावसाचे असमान वितरण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर व जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पांगरदरवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजनाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काटी कृषी मंडळ अधिकारी श्री. विठ्ठल नागटिळक यांनी मार्गदर्शन करताना, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले.

प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, बीबीएफ (BBF) तंत्रज्ञानाद्वारे पेरणी, तसेच बदलत्या हवामानात पीक व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कमी पावसाच्या परिस्थितीत बियाण्यांची उगवण, फुलधारणा व फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात योग्य नियोजन करावे, कोरडवाहू क्षेत्रात हलकी पेरणी करावी तसेच मध्यम व भारी जमिनीत रुंद सरी-वरंबा पद्धतीने व उताराला आडवी पेरणी करावी, असा सल्ला देण्यात आला. तसेच कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आणि शेतात जलसंधारणाची कामे राबवून जमिनीची जलधारणाशक्ती वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक संकपाळ, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती योगिता पवारसत्यवान साळुंकेमाणिक सावंतप्रभाकर गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page