महाराष्ट्र

जरांगे पाटलांचे पुन्हा आंदोलन; १६ मे रोजी पुढील भूमिकेची घोषणा

जालना | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत, तसेच आंदोलनादरम्यान दिलेली अनेक आश्वासने सरकारने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. सातारा संस्थानचे गॅझेटीअर लागू करण्यात आले नाही, तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या व्हॅलिडिटीबाबतही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सरकार आवश्यक अधिकार देत नसल्याचाही आरोप जरांगे-पाटील यांनी केला. मराठा समाजाची कामे व्हावीत अशी सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येत असून समाजाने हे डावपेच ओळखले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे येत्या १६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page