तुळजापूरच्या शेतकऱ्यांची झेप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच हजार टन द्राक्ष निर्यात
165 ते 175 रु./ किलो दर, कोट्यवधींची उलाढाल

गणेश गायकवाड
तुळजापूर / प्रतिनिधी
एकेकाळी दगडी माळरान आणि कुसळांनी व्यापलेला तुळजापूर तालुका आज द्राक्ष उत्पादन आणि निर्यातीतून जिल्ह्यात नवे पर्व लिहित आहे. जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर येथील शेतकऱ्यांनी तब्बल पाच हजार टन द्राक्षांची निर्यात करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली भक्कम छाप उमटवली आहे. या द्राक्षांना प्रति किलो 165 ते 175 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
युरोप, फ्रान्स, अमेरिका, इजिप्त, लिबिया तसेच विविध अरब राष्ट्रांमध्ये तुळजापूरच्या द्राक्षांची मागणी वाढत असून, दर्जेदार उत्पादनामुळे या भागाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, तालुक्यातील 594 शेतकऱ्यांनी 574 हेक्टर क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे, येथील वैष्णवी द्राक्ष बागायतदार संघाने संघ शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. वडगाव काटी, सावरगाव, काटी आणि जळकोटवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी एकत्र येत दोन हजार टन द्राक्ष निर्यात करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. थमसन, क्लोन, फ्लेम, माणिक चमन, एसएसएन, आर.के. या विविध वाणांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. उत्तम दर्जा, योग्य पॅकिंग आणि निर्यातीसाठी आवश्यक निकष पाळल्यामुळे तुळजापूरच्या द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत कोरोना महामारी, अतिवृष्टी, दुष्काळसदृश परिस्थिती, रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही शेतकऱ्यांनी हार न मानता मेहनतीच्या जोरावर यंदा द्राक्ष शेतीत मोठा नफा कमावला. मागील दशकात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती फायदेशीर ठरल्याचे चित्र आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा फटका
दरम्यान, काही अरब देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत थोडा अडथळा निर्माण झाला असून अपेक्षित दरापेक्षा कमी भाव मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूण उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला
“आम्ही 20 शेतकरी एकत्र येऊन सुमारे 200 एकरावर द्राक्ष लागवड केली. संघ पद्धतीने काम केल्यामुळे खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढले. दोन हजार टन निर्यात ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. तरुणांनी पारंपरिक शेतीऐवजी द्राक्ष बागेकडे वळावे,”
श्री. हणमंत गवळी, द्राक्ष उत्पादक व शेती तज्ञ
संघ शेती व आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे
“काटी मंडळातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत आहे. संघ शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष लागवड केल्यास आणखी प्रगती शक्य आहे,”
श्री. विठ्ठल नागटिळक, मंडळ कृषी अधिकारी
तुळजापूरची नवी ओळख
दगडी माळरानातून द्राक्ष निर्यात करेपर्यंतचा प्रवास हा शेतकऱ्यांच्या जिद्दीचा आणि बदलत्या शेती पद्धतीचा उत्तम नमुना ठरला आहे. योग्य नियोजन, संघ शेती आणि बाजारपेठेची अचूक ओळख यामुळे येत्या काळात तुळजापूर तालुका राज्यातील प्रमुख द्राक्ष निर्यातदार तालुके म्हणून अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत.



