लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहात पकडला, तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये ACB चा सापळा, पोलीस उप निरीक्षक आरधवाड अटकेट

धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तुळजापूर पोलिस ठाण्यात धडक कारवाई करत सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे तुळजापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८), पोलिस ठाणे तुळजापूर, जि. धाराशिव (वर्ग-३) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपीने यापूर्वी १० हजार रुपये लाच घेतल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात अतिरिक्त कलम लागू न करणे तसेच तक्रारदाराची मोटारसायकल जप्त न करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर हा व्यवहार ५ हजार रुपयांवर ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
दि. ४ मार्च रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचत तक्रारदार व पंचाला तुळजापूर पोलिस ठाण्यात पाठवले. आरोपीने ठरल्याप्रमाणे ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACBच्या पथकाने त्याला पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत ५,३०० रुपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस ओळखपत्र, चाव्यांचा गुच्छ, पांढरा रुमाल, निळा कंगवा, पेन आणि काळा चष्मा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या घराची झडती व मोबाईल तपासणीही सुरू असल्याची माहिती ACBने दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे (ACB, धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करत असून, पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे करत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (ACB, छत्रपती संभाजीनगर) यांचे होते. पथकात पोहेकॉ आशिष पाटील, पोलिस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी.
टोल फ्री क्रमांक : १०६४
व्हॉट्सॲप : ९२७०२३१०६४
पोलीस अधीक्षक, ACB छ. संभाजीनगर : ९०११०९२७७७
पोलीस उपअधीक्षक, ACB धाराशिव : ९०४९५१९८३३
ACBच्या या कारवाईमुळे तुळजापूर पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात कडक संदेश दिला गेल्याची चर्चा सुरू आहे.


