महाराष्ट्र

एसटी प्रवाशीही ‘स्मार्ट’ तुळजापूर आगारात ‘NCMC’ कार्डचा शुभारंभ

तुळजापूर  – तुळजापूर आगारात २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रवासी सेवेच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा गाठण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि EbixCash यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पांतर्गत स्मार्ट कार्ड नोंदणीचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला.

या उपक्रमामुळे तुळजापूर तालुक्यातील एसटी प्रवाशांना आता डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रोख व्यवहारावरील अवलंबित्व कमी करून स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिकीट व्यवहार अधिक पारदर्शक व सोयीस्कर होणार आहेत.

कार्यक्रमास विभाग नियंत्रक श्री.अजय पाटील तसेच विभागीय वाहतूक अधिकारी श्री.संतोष कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक श्री.रामचंद्र शिंदे, आगार लेखाकार श्री.सुधीर बामणकर, वरिष्ठ लिपीक श्री.सागर सूर्यवंशी तसेच कर्मचारी श्री.नागू मसुते, श्री.जी. एम.घुगे, श्री.अमोल जाधव, श्री.विलास राठोड, श्री.बाळासाहेब मुगुटराव आणि श्री.एम.व्ही. सुरवसे उपस्थित होते.

EbixCash कंपनीच्या वतीने विभागीय प्रतिनिधी श्री.राहुल सूर्यवंशी आणि श्री.संतोष पेटकर यांनी तांत्रिक मार्गदर्शन करत योजनेची सविस्तर माहिती दिली.

महामंडळाच्या दोन महत्त्वाच्या योजनांअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते पहिल्या स्मार्ट कार्डांची नोंदणी करण्यात आली. या सुविधेमुळे प्रवाशांना एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार असून, भविष्यात संपूर्ण राज्यात डिजिटल प्रवास व्यवस्थेला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तुळजापूर आगाराने या उपक्रमातून ‘स्मार्ट प्रवासी – स्मार्ट महाराष्ट्र’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याची दिशा दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page