राजकुमार भाऊंच्या पुढाकारामुळे सावरगावची स्वच्छतेकडे वाटचाल
हिंदू स्मशानभूमी परिसर झाला चकाचक; गावकऱ्यांची दुर्गंधीतून सुटका

यशवंत (भैया) कुलकर्णी
सावरगाव / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील विद्यमान सरपंचपती व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजकुमार पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सावरगाव गावाची विकास व स्वच्छतेकडे भक्कम वाटचाल सुरू झाली आहे. त्यांच्या विशेष लक्षामुळे हिंदू स्मशानभूमी परिसराची दुरवस्था दूर होऊन हा भाग आता स्वच्छ, नीटनेटका आणि चकाचक होताना दिसत आहे.
सावरगाव हे तुळजापूर तालुक्यातील एक मोठे व लोकसंख्येने समृद्ध गाव असून येथे सुमारे सात ते आठ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. सावरगाव–केमवाडी रस्त्यालगत असलेली हिंदू स्मशानभूमी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिली होती. परिसरात नैसर्गिक विधी, लघुशंका तसेच अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते. या दुर्गंधीमुळे व अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सावरगावच्या सरपंच सौ. सुवर्णा पाटील यांचे पती तथा गावचे नेतृत्व करणारे श्री. राजकुमार पाटील यांच्याकडे नागरिकांची खंत मांडली. या समस्येची गंभीर दखल घेत राजकुमार पाटील यांनी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेतली असून, घाण करणाऱ्यांना थेट मज्जाव केला आहे.
विशेष म्हणजे, राजकुमार पाटील स्वतः पहाटे पाच वाजता या परिसरात हजर राहून लक्ष ठेवतात. जे नागरिक येथे घाण करतात त्यांची ते प्रत्यक्ष कानउघडणी करतात, स्वच्छतेचे महत्व समजावून सांगतात आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, हे ठामपणे पटवून देतात. त्यांच्या या भूमिकेमुळे परिसरात शिस्त निर्माण झाली असून नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागृती होत आहे.
लवकरच ग्रामपंचायत निधीतून या हिंदू स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छ रस्ते, झाडे लावणे, पाण्याची व्यवस्था, बसण्याची सोय व प्रकाशव्यवस्था अशा सुविधा देऊन या परिसराचे रूपडे पूर्णपणे पालटण्याचा संकल्प राजकुमार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमामुळे सावरगावच्या नागरिकांना दुर्गंधी व घाणीपासून मोठा दिलासा मिळाला असून, गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असे आवाहनही ग्रामपंचायत व राजकुमार पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे सावरगाव हे स्वच्छतेचे आदर्श गाव बनण्याच्या दिशेने निश्चितच वाटचाल करत आहे.



