जिल्हा परिषद निवडणुकीआधीच काटगाव गटात बंडखोरीचा सूर
नेतृत्वाला थेट इशारा; बाहेरचा उमेदवार नकोच!

काटगाव गटात ‘स्थानिकच उमेदवार हवा, गेटकेन नको’चा सूर
तामलवाडी | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तामलवाडी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीत गटातील व गणातील संभाव्य उमेदवार, बूथ प्रमुख तसेच गटप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत एकच ठाम भूमिका समोर आली, ती म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार हा स्थानिक आणि गटातीलच असावा. बाहेरून लादलेला ‘गेटकेन’ उमेदवार नको, असा स्पष्ट सूर उपस्थितांनी लावला. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या, गटात सातत्याने काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यालाच तिकीट देण्यात यावे, अशी मागणी जोरकसपणे मांडण्यात आली.
भाजप कार्यकर्त्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले असून, निवडणुकीआधीच काटगाव गटात बंडखोरीचा सूर उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बैठकीदरम्यान संभाव्य उमेदवारांनी थोडक्यात आपला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले. गटातील प्रश्न, विकासकामे, जनतेशी असलेला संपर्क तसेच पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
या बैठकीस गटप्रमुख यशवंत लोंढे, गण प्रमुख बाबा बेटकर व बालाजी शिंदे यांच्यासह संभाव्य उमेदवार ज्ञानेश्वर माळी, विजय शिंगाडे, राम जवान, निवृत्ती माळी, दादासाहेब घोडके, रविकांत गुरव, रवी माळी, मधुकर चेंडके, दत्तात्रय वडणे, इंद्रजीत घोटकर, रामलिंग सगर, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, युसुफ मुलानी, तमीज पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकूणच या बैठकीतून काटगाव गटात स्थानिक नेतृत्वालाच संधी द्यावी, अशी स्पष्ट व एकमुखी भावना व्यक्त झाल्याचे चित्र दिसून आले.
तुळजापूरातील नेत्याचा उमेदवारीवर डोळा
तुळजापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचा एक नेता गेल्या पंधरा दिवसांपासून काटगाव जिल्हा परिषद गटात चकरा मारत असून, निवडणुकीच्या तोंडावर जनसंपर्क वाढवताना दिसत आहे. गटातील मोजक्या कार्यकर्त्यांना धाब्यावर पार्टी देत तो पक्ष नेतृत्वाकडे आपल्या तिकीटासाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, याला काटगाव गटातील भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शविला असून, आम्ही केवळ पक्षाच्या सतरंज्याच उचलायच्या का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे औतसुक्याचे ठरणार आहे.



