धक्कादायक…! क्षणात उद्ध्वस्त झाले चार संसार
केशेगाव शिवारात भीषण विद्युत अपघात, दोन पितापुत्रांसह चौघांचा होरपळून मृत्यू
तुळजापूर (प्रतिनिधी) : तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण विद्युत अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. बोअरमधील मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाल्याने दोन पितापुत्रांसह चार जणांचा तीव्र विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे केशेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
ही घटना शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअरमधून मोटार बाहेर काढण्यासाठी कप्पीच्या सहाय्याने काम सुरू होते. काम सुरू असतानाच कप्पीचा अचानक महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाला. त्यामुळे कामात सहभागी असलेले सर्वजण विजेच्या प्रवाहाच्या कचाट्यात सापडले.
या भीषण अपघातात काशिम कोंडीबा फुलारी (वय ५४), रतन काशिम फुलारी (वय १६), नागनाथ काशिनाथ साखरे (वय ५५) आणि रामलिंग नागनाथ साखरे (वय ३१), सर्व रा. केशेगाव, ता. तुळजापूर, यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शेत परिसरातील विद्युत वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


