ब्रेकिंग

तुळजापूरात किरकोळ वादातून गोळीबार

भाजप व महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये वाद, एक जण गंभीर जखमी, शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला

तुळजापूर : तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तुळजापूर नगर परिषदेच्या निकालाआधीच भाजप व महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. नळदुर्ग रोडवरील रस्त्याच्या कामावरून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता हाणामारीत रूपांतरित झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने भिडले.

या वादात भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषिकेश मगर यांच्यात जोरदार वाद झाला. हाणामारीदरम्यान कुलदीप मगर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या कुलदीप मगर यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची माहिती असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे नगर परिषदेच्या निकालाआधीच राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page