शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती; कृषी विभागाकडून ‘महाविस्तार AI’ App विकसित
शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करावा - मंडळ कृषी अधिकारी श्री.आनंद पाटील यांचे आवाहन

तुळजापूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी ‘महाविस्तार AI’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित प्रणाली विकसित केली आहे. या नव्या प्रणालीमुळे पीक व्यवस्थापन, रोग नियंत्रण, हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या सर्व बाबी शेतकऱ्यांना अधिक सोप्या, अचूक आणि वेळेत उपलब्ध होणार असून सर्व शेतकऱ्यांनी हे ऍप डाउनलोड करून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी असे आवाहन कृषी मंडळ अधिकारी श्री.आनंद पाटील यांनी केले आहे.
‘महाविस्तार AI’ च्या माध्यमातून शेतकरी आपल्या मोबाईलवरूनच पिकांवरील रोग, किडींची लक्षणे, खत व औषधांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन तसेच बाजारभाव यासंबंधी माहिती मिळवू शकणार आहेत. ही प्रणाली स्थानिक हवामान, मातीचा प्रकार आणि पिकाच्या अवस्थेनुसार वैयक्तिक सल्ला देण्यास सक्षम असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विस्तार सेवांमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवणे, तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा ‘महाविस्तार AI’ चा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेत सुलभ माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कृषी अधिकारी श्री.आनंद पाटील यांनी सांगितले की, “परंपरागत कृषी विस्तार यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘महाविस्तार AI’ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. भविष्यात या प्रणालीला अधिक वैशिष्ट्यांसह संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे.”
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेती अधिक डिजिटल, शाश्वत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत श्री.पाटील यांनी व्यक्त केले आहे.




