तुळजापूर तालुक्यातील गुड मॉर्निंग पथक गायब
स्वच्छता अभियानाचे तीन तेरा, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

प्रतिनिधी/तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक हे उघड्यावर शौचास बसत असल्यामुळे स्वच्छ भारत मिशन अभियानाचे तीन-तेरा वाजले आहेत. या तालुक्यात कोणतेही पथक कार्यरत नसल्यामुळे लोटाबहाद्दरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय उभारणीसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला. मात्र, लाभार्थी शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जाऊन स्वच्छ भारत मिशनला हरताळ फासताना दिसत आहेत. प्रशासनाने ठरवलेल्या उद्दिष्ठांचा टप्पा ग्रामपंचायतीनी पूर्ण केला आहे. मात्र, संबंधित विभागाकडून जनजागृती न झाल्याने लोटा बहाद्दर मंडळींची संख्या वाढत आहे. गाव, तांडा, वाड्या, वस्ती वरिल बहुतांश घरात शौचालय असून त्या शोभेच्या वस्तू बनत आहेत. परिणामी साथ रोगांचा प्रादूर्भाव वाढला असून संबंधित विभागाने ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहिम हाती घेण्याची गरज आहे.



