पिंपळा (खुर्द) –देवकुरुळी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचे हाल
पाच किलोमीटरचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

तुळजापूर / प्रतिनिधी :
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द ते देवकुरुळी या सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास जीवघेणा बनला आहे.
विशेषतः पावसाळ्यानंतर रस्त्यावरील डांबर उखडून खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून, चारचाकी वाहनांचेही नुकसान होत असल्याचे नागरिक सांगतात. रात्रीच्या वेळी तर या रस्त्यावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.
या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक वेळेचा अपव्यय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्याची तातडीने डागडुजी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी पिंपळा खुर्द व देवकुरुळी येथील नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.



