पांगरदरवाडीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यवहारिक ज्ञानाचे धडे
आनंद बाजारच्या माध्यमातून हजारो रुपयांची उलाढाल,

तामलवाडी / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी शिक्षणाला व्यवहाराची जोड देणारा ‘आनंद बाजार’ भरला. वर्गातील शिक्षण पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी या उपक्रमाने विद्यार्थ्यांना दिली.

या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मिठाई व विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या पालेभाज्या, तसेच टोमॅटो, बटाटे, मिरच्या, कांदे, घेवडा, मटार अशा फळभाज्यांनी बाजार सजला होता. पेरू, लिंबू यांसारखी फळेही विक्रीस ठेवण्यात आली होती.
इडली-सांबर, ढोकळा, उडीद वडे, दहीवडा, आप्पे या दाक्षिणात्य पदार्थांबरोबरच मिसळपाव, पाववडा, पॅटीस, बटाटेवडा, अळुवड्या, बाकरवडी, शाबुवडा, पावभाजी, समोसे, फरसाण, भजी, पाणीपुरी, भेळ अशा महाराष्ट्रीयन पदार्थांनी आनंद बाजाराची रंगत वाढवली. गुलाबजाम, बालुशाही, सोनपापडी यांसारख्या मिठाई व चहाच्या दुकानांनी बाजार अधिकच गजबजला.

बालविक्रेत्यांनी उभारलेल्या या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. “हा उपक्रम आमच्यासाठी नवा असून तो आनंद देणारा व समाधान देणारा आहे,” अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना व्यवहारातील जमा-खर्च, नफा-तोटा समजावा, व्यवहारिक जीवनाचे धडे मिळावेत आणि भविष्यातील व्यावसायिक जडणघडण व्हावी, या हेतूने हा उपक्रम शाळा स्तरावर राबवण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांकडून वस्तू व पदार्थ खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांची उलाढाल केली. खरेदी-विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास विशेष लक्षवेधी ठरला. काही ठिकाणी फोनपे व पेटीएमद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे मुलांना कॅशलेस व डिजिटल व्यवहाराची प्रत्यक्ष ओळख झाली.



