राजकीय
चिटफंड व मल्टिस्टेट फसवणूक : ठेवीदारांचे पैसे तातडीने परत द्या – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

धाराशिव : सामान्य नागरिकांनी घाम गाळून जमा केलेल्या कष्टाच्या पैशांची चिटफंड आणि मल्टिस्टेट संस्थांनी मोठ्या प्रमाणावर लूट केल्याचा मुद्दा लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे धगधगला. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गंभीर विषयावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला थेट जाब विचारला.
खासदार राजेनिंबाळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की,
की पल्स इंडिया लिमिटेड, समृद्ध जीवन, सहारा इंडिया लिमिटेड, गुरुप्रसाद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्ञानराधा मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, साईराम अर्बन बँक, भगवान बाबा मल्टीस्टेट अशा कंपन्या आणि संस्थांमध्ये देशातील लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांपर्यंतचे पैसे अडकलेले आहेत.
या संस्थांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उभी केली. मात्र मुदत संपल्यानंतर पैसे परत न देता अनेक संस्था बंद पडल्या, तर काहींचे संचालक फरार झाले.
यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून ठेवीदार आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडले आहेत.
सरकारच्या निरुत्साही भूमिकेवर टीका करत राजेनिंबाळकर म्हणाले,
“ठेवीदार न्यायासाठी वणवण फिरत असताना सरकार केवळ कागदी चौकशी आणि पोकळ आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले आहे. दोषींना संरक्षण दिले जात आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.”
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत चिटफंड व मल्टिस्टेट संस्थांमुळे व्यापक फसवणूक झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी
लोकसभेत ठाम भूमिका मांडताना खासदार राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या:
•दोषी कंपन्या व संस्थांची सर्व चल-अचल मालमत्ता त्वरित जप्त करावी
•जप्त मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत द्यावेत
•भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी मल्टिस्टेट व चिटफंड क्षेत्रावर कठोर नियंत्रण व नियमन आणावे.
त्यांनी सांगितले की,
“ही केवळ आर्थिक फसवणूक नाही तर सामान्य नागरिकांच्या विश्वासाची लूट आहे. सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत.”



