महाराष्ट्र

२२ गावांच्या महिलांनी उभारला उद्योगाचा किल्ला

शेळी-कोंबडी उद्योगातून महिलांची आर्थिक सत्ता मजबूत, सीएसआरमधून आत्मनिर्भरतेकडे: तुळजापूरच्या महिलांची यशोगाथा

तुळजापूर तालुक्यात महिला उद्योगाची नवी चळवळ उभी राहील – सुजया शेट्टी

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यात महिला उद्योगाची एक मजबूत आणि टिकाऊ चळवळ उभी राहत असून, कोहिजन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली तुळजाई महिला शेळी व कोंबडी उत्पादक कंपनी ही मराठवाड्याच्या विकासप्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद सुजया शेट्टी यांनी व्यक्त केला.

HDFC Bankच्या सीएसआर निधीतून व Cohesion Foundation Trust यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील २२ गावांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सन २०२३ मध्ये जवळगा मेसाई येथे तुळजाई महिला शेळी व कोंबडी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

या महिला कंपनीच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन जवळगा मेसाई येथील कंपनी कार्यस्थळी उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना सुजया शेट्टी यांनी महिलांच्या सामूहिक उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे नमूद केले.

महाराष्ट्र राज्याचे सीएसआर व्यवस्थापक योगेश पगारे यांनी तुळजाई महिला कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकत, भविष्यात ही कंपनी कोट्यवधी रुपयांचा निधी साठवून हजारो कुटुंबांचा आर्थिक आधारस्तंभ बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष जलसमर्पण करून करण्यात आली. कोहिजन फाउंडेशनच्या वतीने शासकीय योजनांची पुस्तिका व कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले. कंपनीच्या अध्यक्षा गंगा नन्नवरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक स्नेहल पाटील यांनी केले.

कोहिजनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे यांनी मागील तीन वर्षांतील महिला कंपनीच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. गुजरात येथील कोहिजनच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी धर्मेंद्र प्रसाद तसेच उपजीविका अधिकारी मनोहर दावणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

बसवंतवाडी येथील कवी प्रदीप पाटील यांनी कोहिजन व एचडीएफसी बँकेच्या कार्याचा गौरव करणारी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

या सभेसाठी तुळजापूर तालुक्यातील २२ गावांमधून सुमारे ५०० महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी केले, अहवाल वाचन ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा पुरी यांनी केले.

कार्यक्रमास दिनेश भोसले, मनोज देवकाते, अजित बनसोडे, रवी भगत, प्रदीप कांबळे, जीवन मिसळ, सुवर्णा नन्नवरे व सहकारी, अर्चना देशमुख, सरपंच मनीषा यल्लाळ, विठ्ठल होरटे, भाग्यश्री जाधव, पल्लवी माने, अमोल सोमवंशी, रेश्मा बोबडे, सुनीता माडजे, संचालिका किष्किंदा माडजे, जोतिबा पोळ, मंजुषा मगर, पार्वती भगत, कोमल लोखंडे, शुभांगी पुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page