महाराष्ट्र

सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या, आरोपीची त्याच्याच गावात काढली धिंड

तामलवाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपी अटकेत

तामलवाडी / प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी म्हैस चोरीस सराईत असलेल्या तीन चोरट्यांना अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चोरून नेलेला मुद्देमाल तसेच चोरीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये जनावर चोरीच्या घटनांप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीद्वारे दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी डिसेंबर महिन्यात नांदुरी येथून तीन म्हशी चोरल्याची कबुली दिली.

आरोपींनी यातील एक म्हैस लातूर येथील सोहेल साजिद कुरेशी यांना विकल्याचेही उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी सोहेल कुरेशी यांना अटक करून म्हैस विक्रीतून मिळालेली रक्कम जप्त केली. तसेच आरोपी अजीम निजाम सय्यद (रा. सावरगाव) याच्याकडून दोन म्हशी जप्त करण्यात आल्या आहेत.

या गुन्ह्यात चोरीसाठी म्हशींची वाहतूक करण्यासाठी आरोपी निलेश नागनाथ तानवडे (रा. सावरगाव) यांच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अजीम निजाम सय्यद हा सराईत जनावर चोर असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याची त्याच्याच गावात धिंड काढून गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

आरोपीकडून आणखी जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, शफाकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आबासाहेब तोगे, जुबेर काझी, सुरज नरवडे, गोपाळ सलगर, गायकवाड, शेख, नितीन भोसले यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page