वीस वर्षानंतर धावली पांगरदरवाडी – तुळजापूर लालपरी
विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांसह प्रवाशांची झाली सोय,गावाकऱ्यांनी मानले महामंडळाचे आभार

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावात वीस वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आली असून शालेय विध्यार्थी, जेष्ठ नागरिकांसह गावाकऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. गेल्या वीस वर्षांपासून एस.टी बससेवा बंद असल्यामुळे येथील नागरिकांचे प्रवासासाठी प्रचंड हाल होत होते. याचे गांभीर्य पाहून ग्रामपंचायत प्रतिनिधीनी एसटी महामंडळाकडे पत्र व्यवहार करत सतत पाठपुरावा करून अखेर बस सुरु केली.
तुळजापूर ते पांगरदरवाडी पहिली बस फेरी आज सोमवार दि.8 रोजी सकाळी 9.30 वाजता गावात दाखल झाली. प्रारंभी गावाकऱ्यांनी बसचे स्वागत करून नारळपानांचे तोरण बांधून बसची पूजा केली. बसचे चालक श्री.नितीन इंगळे व वाहक श्री.नागनाथ मसुते यांचा गावाकऱ्यांनी सत्कार केला. पांगरदरवाडी गावची लोकसंख्या जवळपास तीन हजारच्या वर असुन येथील नागरिक शासकीय व वैयक्तिक कामासाठी दैनंदिन तुळजापूरला जात असतात. तसेच या गावातील शेकडो विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तुळजापूरला जात आहेत. गत पंचेवीस वर्षांपूर्वी या गावास बससेवा सुरु होती. मात्र, एसटी महामंडळाने रस्ता खराब असल्यामुळे ही बससेवा बंद केली होती. सध्या पांगरदरवाडी गावास बससेवा सुरु झाल्यामुळे गावाकऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. तुळजापूरचे आगार प्रमुख श्री.रामचंद्र शिंदे, विभाग नियंत्रक श्री.अजय पाटील, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांचे गावाकऱ्यांनी आभार मानले.
तुळजापूर बसस्थानकात पांगरदरवाडीला जाण्यासाठी सकाळी साडे आठला बस लागले. हि बस गंजेवाडी तामलवाडी करून पांगरदरवाडीला 9.30 वाजता येते तर संध्याकाळची बस तुळजापूर बसस्थानकात पांगरदरवाडीला जाण्यासाठी चार वाजता लागते.


