मराठवाड्यातील पाच चोरींचा उलगडा, एअरटेल टॉवर चोरीतील आरोपी अटकेत
उत्तर प्रदेशातील आरोपी तामलवाडी पोलिसांच्या जाळ्यात

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या एसएफ/डीएलए कार्ड प्लेट चोरीप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका आरोपीला तामलवाडी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. ही कारवाई बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.
तामलवाडी येथील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील डीएलए/एसएफ प्लेटची चोरी ७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी केली होती. या घटनेप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी धुव्र त्रिभुवन प्रसाद (वय २५, रा. भागदिवा ग्राम, तहसील बारा जी, जिल्हा प्रयागराज, उत्तर प्रदेश) व त्याचा साथीदार हे खोटे आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स सादर करून मोठ्या शहरांतून भाड्याने वाहने घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हे आरोपी दिवसभर विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवरची टेहळणी करून रात्री महागड्या डीएलए कार्ड प्लेटची चोरी करीत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. त्याने मराठवाड्यातील पाच ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचेही मान्य केले आहे.
दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत आरोपी महाराष्ट्रात पुन्हा येऊन आणखी गुन्हे करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वैराग–गौडगाव मार्गे देवळाली गावाच्या शिवारात (बेंबळी पोलीस स्टेशन हद्द) आरोपी आल्यावर त्याला रंगेहाथ पकडून रात्री अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, हवालदार संजय कलमदाणे, सुरज नरवडे, नितीन भोसले व पोलीस मित्र अमोल पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.


