निस्वार्थी सेवेतून बनल्या शेतकऱ्यांचा आधार – ग्राम महसूल अधिकारी संजीवनी स्वामी यांची प्रेरणादायी वाटचाल
जागतिक महिला दिन विशेष

जागतिक महिला दिन विशेष
तामलवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) व पांगरदरवाडी या गावांसाठी कार्यरत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी श्रीमती संजीवनी स्वामी यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. सरकारी सेवेत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवत त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. कर्तव्यनिष्ठा आणि शेतकऱ्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना यामुळे त्यांनी अल्पावधीतच शेतकऱ्यांचा व नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
महसूल विभागातील कामकाज अनेकदा कागदपत्रे, नोंदी आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे गुंतागुंतीचे असते. मात्र श्रीमती स्वामी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या जमिनीशी संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार, जमीन नोंदी यांसारख्या महत्त्वाच्या कामांबाबत मार्गदर्शन करून त्यांची कामे वेळेत पूर्ण करून देणे शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडवणे, त्यांच्या जमिनीशी संबंधित प्रश्न तत्परतेने मार्गी लावणे आणि कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.

सांगवी काटी या महसूली गावातून पांगरदरवाडी हे स्वतंत्र महसूली गाव करण्याच्या प्रक्रियेतही श्रीमती स्वामी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सातबारा वेगळा करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेत अनेक कागदपत्रे, नोंदी आणि तपशीलांची अचूक पूर्तता आवश्यक असते. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत तांत्रिकदृष्ट्या काटेकोरपणे काम केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदींबाबत मोठा दिलासा मिळून पांगरदरवाडी हे महसूली गाव बनवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका असल्याचे गावकरी सांगतात.
सरकारी सेवेत असताना केवळ कागदोपत्री काम न करता लोकाभिमुख दृष्टीकोनातून काम करणे हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि वेळेवर काम पूर्ण करणे यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजासाठी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने सेवा देणाऱ्या श्रीमती संजीवनी स्वामी या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे महसूल विभागाबद्दल लोकांमध्ये विश्वास आणि सकारात्मकता निर्माण होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.



