राजकीय

निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग; सोमवारपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

फेब्रुवारीत मतदान, लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते ‘ॲक्टिव्ह मोड’वर

धाराशिव | प्रतिनिधी

राज्यात महापालिका निवडणुकांचा रणशिंग फुंकला गेल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुलही पुढील आठवड्यात वाजण्याची दाट शक्यता आहे. दि. १२ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकसत्ता धाराशिव’कडे व्यक्त केले आहे. त्यानुसार सोमवारपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरक्षण मर्यादेच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय निवडणूक आयोग अंतिम टप्प्यात घेत असल्याचे समजते. धाराशिव जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ आणि ३३६ पंचायत समित्यांपैकी १२५ निवडणुका २४ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात आयोगाची तयारी पूर्ण झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील २८६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन आयोगाने केले आहे.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात धाराशिव, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, कोल्हापूर आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळत आहेत. महापालिका निवडणुका झाल्या नसलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमुळे ग्रामीण भागाचे लक्ष अधिक वेधले जाणार आहे.

दरम्यान, २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने त्या निवडणुका पुढील टप्प्यासाठी ढकलल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. मात्र, या कालमर्यादेत सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणे अवघड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या २० जिल्हा परिषद आणि १२१ पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्या निवडणुका पुढील टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. उर्वरित १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला असून लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते ‘ॲक्टिव्ह मोड’वर आले आहेत. ग्रामीण भागात बैठका, संपर्क दौरे आणि शक्तिप्रदर्शनाला जोर येऊ लागला असून निवडणूक वातावरण तापू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page